कोरोना संपेल आणि शाळांचे पुढील वर्ष सुरु होईल. म्हणजे होईलच! तर नव्या शिक्षकांच्या मुलाखती सुरु झाल्या. अर्थात झूम वर.
(जाता जाता, युरोपियन शिक्षकांचा गल्फकडे परत ओढा वाढतो आहे. मधल्या तीनचार वर्षात याला जरा ओढ बसली होती.)
तर बाई ब्रिटीश होत्या. दहा वर्षांचा अनुभव गाठीशी. कोरिया, व्हिएतनाम, इथे ओमानमध्ये एक वर्ष, आणि पाचेक वर्षे इटलीतल्या वेगवेगळ्या शाळांत. मुलाखतीत त्या हसून हसून उत्तरे द्यायचा प्रयत्न करत होत्या. पण उत्तरांमध्ये सलगता नव्हती. अशा वेळी प्रश्न विचारण्यापेक्षा तुम्ही तुमचा एखादा बरा वाईट अनुभव सांगा, असं म्हणाले शेवटी. तो ही त्यांना धड सांगता येईना. ओके म्हणून मिटिंग संपवली. परत बायोडेटा पाहिला, qualifications, experience बद्दल प्रश्नच नव्हता.
सहकार्यांशी चर्चा केली. म्हटलं, अशा कठिण काळात आपण सुखात म्हणा, सुपात म्हणा, तसे आहोत. बाई कितीकाळ घरात एकट्या म्हणजे एकट्या आहेत माहित नाही. गल्लीत एक मृत्यू झाला तर आपल्याला दिवसरात्र छळतो. त्यांच्या डोळ्यांसमोर किती गेले, कसे गेले , कोण कोण गेले,माहित नाही. तर तंग वातावरणातील एवढ्याशा बोलण्यावरून पूर्ण शिक्षकावर फुली मारायला नको. आपण त्यांना झूमवरच डेमो लेसन घ्यायला सांगू, यावर सगळ्यांचे एकमत झाले.
रंगीबेरंगी चित्रे, कार्ड्स, घरात जे म्हणून मिळाले असेल त्यातून निवडून निवडून comparison चा लेसन घेतला. झूमवर वस्तू वापरून लेसन घेणे तसे जिकीरीचे आहे. पण शिकवताना, बाई खुलल्या. आत्त्ताचे हसू खरे होते. दडपण नव्हते. हरेक शंकेचे, उदाहरणासह निरसन केले.
लेसन संपला. होकाराची मेल पाठवली. तिकडून लगेच उत्तर आले, 'खूप खूप धन्यवाद. मुलाखती नंतर मी आशा सोडली होती, पण लेसन घ्यायची संधी दिलीत. खूप खूप आभार. दोनेक महिने कोंडून होते, झूमच्या का होईना वर्गात आले, आणि खरोखर जिवंत वाटले. सोबत कागदपत्रे जोडत आहे. विमाने उडू लागली की भेटू.'
पत्र ऑफिशियल असले तरी अनौपचारिक मवाळपणा जाणवत होता. जगभरात थैमान चालले आहे. पण धीराचे, समजुतीचे, हात देण्याचे छोटे छोटे टाकेच फाटलेल्या आभाळाला जोडतील, हीच आशा. भाबडी वाटली तरी.
न जाणो, उद्या मी त्या बाईंच्या जागी असेन!! हे पण आहेच की!
(माझ्या एकटीच्या हातात काही नाही. आमच्या सगळ्या टीमचे मिळून निर्णय असतात. माझे कौतुक नका करू प्लीज. 🙂)