खारीचा वाटा आणि सिंहाचा वाटा
खारीला स्वत:च पुरून ठेवलेल्या बिया बऱ्याच वेळा सापडत नाहीत. या मातीत राहून गेलेल्या बिया योग्य वातावरण मिळताच, उगवून येतात, त्यातून जंगले निर्माण होतात. तरी खारीचा वाटा म्हणजे अगदी इवलासा मानला जातो.
सेतूबांधणीत तिने जे यथाशक्ती काम केले, त्याचे कौतुक रामाने केले, ही कथा आहेच . तरीही नकळतपणे तिच्या हातून निसर्गात जे मोठे काम होते, त्यावर 'खारीचा वाटा' असा कंजूस शिक्का का बसला असावा?
तर, शिकारीनंतर त्यातला सगळ्यात मोठा वाटा स्वत:कडे ठेवून बाकीच्यांना एवढे तेवढे देणारा सिंव्ह मात्र जंगलचा राजा! यावर इसापपासून ते सुफी पर्यंतच्या बोधकथाही आहेत.
ज्याने एखाद्या क्षेत्रात भरीव काम केले आहे, कुठल्या कार्यात निरपेक्षपणे मोठा भार उचलला आहे त्यासाठी मात्र भाषेत 'सिंहाचा वाटा उचलला' असा कौतुकाचा वाक्प्रचार वापरला जातो. अगदी इंग्लिशमध्येही a lion's share आहे.
भाषेतील असे वाक्प्रचार प्रत्यक्षातील अनुभवांवर आधारित असतात, की वर्षानुवर्षे चालत आलेल्या कथाकहाण्यांतून येत राहतात, की या सगळ्यांच्याच बेमालूम मिश्रणातून येतात? असे होत असेल, तर भाषा विपरीत अनुभव पुढे नेते का? मग ही सत्यासत्यता कशी पडताळून पहावी? असत्य असेल ते भाषाजीवनातून कसे काढून टाकता येईल? की ते तसेच राहू देणे हे समाजातील काही घटकांच्या फायद्याचे असते?
अशात आजूबाजूचे वास्तव बघताना 'खारीचा वाटा' उचलणारे लोक 'सिंहाचा वाटा उचलणाऱ्यांच्या' खिजगणतीत तरी आहेत का, हा प्रश्न राहून राहून भेडसावतो आहे.
No comments:
Post a Comment