Friday, 28 February 2020

कोवळ्या उन्हात बसावेसे वाटते

......कोवळ्या उन्हात बसावेसे वाटते
उन्हानेच तुझ्या पाठीवर लिहावेसे वाटते
थंडीचा काटा पापणीने मोडावासा वाटतो
दुखलंच तुला तर विचारावंसं वाटतं,
' 🌺🌸🌺🌸🌺?'
'ही कोणती भाषा?' म्हणून विचारलेस कि
'मला नाही माहित!' म्हणून पळून जावेसे वाटते...
.......कोवळ्या उन्हात बसावेसे वाटते
हळूहळू चढत्या उन्हात,
सावली व्हावेसे वाटते
सावलीने तुझा चेहरा झाकावासा वाटतो
हसण्याहसण्यात घडी मोडावीशी वाटते
ओंजळभर चेहरा घमघमला कि
'हीच ती भाषा!' सांगावेसे वाटते...
कोवळ्या उन्हात बसावेसे वाटते....

......कोवळ्या उन्हात बसावेसे वाटते

......कोवळ्या उन्हात बसावेसे वाटते
उन्हानेच तुझ्या पाठीवर लिहावेसे वाटते
थंडीचा काटा पापणीने मोडावासा वाटतो
दुखलंच तुला तर विचारावंसं वाटतं,
' 🌺🌸🌺🌸🌺?'
'ही कोणती भाषा?' म्हणून विचारलेस कि
'मला नाही माहित!' म्हणून पळून जावेसे वाटते...
.......कोवळ्या उन्हात बसावेसे वाटते
हळूहळू चढत्या उन्हात,
सावली व्हावेसे वाटते
सावलीने तुझा चेहरा झाकावासा वाटतो
हसण्याहसण्यात घडी मोडावीशी वाटते
ओंजळभर चेहरा घमघमला कि
'हीच ती भाषा!' सांगावेसे वाटते...
कोवळ्या उन्हात बसावेसे वाटते....

विद्याताई



त्यांच्या बैठकीच्या भिंतीवर एक फोटो होता. एक लहान मुलगा आणि मुलगी आपापल्या चड्डीत बघून गंमतीने हसत आहेत. मलाही ती फ्रेम पाहून हसू आले. तशी त्या म्हणाल्या, ‘बाई आणि पुरुष यांच्यात तोच चिमूटभर फरक असतो. बाकी काही नाही.’ हे सांगणं फार सहज होतं.
पुढे child-free राहण्याचा निर्णय सांगितला तेव्हा माझ्याकडे निरखून पहात म्हणाल्या, ‘असेही स्वातंत्र्य असते, याची जाणिव झाली, हे महत्वाचे. यावर चालणे किती कठिण आहे, मी समजू शकते. डगमगू नकोस, मस्त जग आणि लिहित रहा.’
‘मिळून साऱ्याजणी’ साठी दोनदाच लिहिणे झाले, आणि नंतर गाव, देश सुटला. माणूसही सुटलं, पण तुटलं नाही. विचार सोबत राहिले. कायम.
बाईचा माणूस म्हणून विचार आणि स्वीकार व्हावा यासाठी अखंड काम करणारे, जितके कणखर, तितकेच हळवे, प्रसन्न व्यक्तित्व निमाले.
कविता महाजनांनंतर, आमचा आणखी एक जवळचा आवाज हरपला. आदरांजली. 🙏

ही रंगीत लय सुंदर आहे.

सूर्य अजून उग्र झाला नाही. संध्याकाळ सोनेरी करण्याइतकी कोवळीक त्याच्यात आहे. आपण ते सोने अंगावर घेत डुलत डुलत या देखण्या रस्त्यावरून जात आहोत.
पावसातून उठून गडद रंगांची फुले पुन्हा तरारून हसत आहेत.
खजुराच्या झाडांवर नरमाद्यांचे तुरे एकत्र आणण्याचे काम प्रेमळ इंडोनेशियन माळिणीने पार पाडले आहे. तिने हे मला अरबीत सांगितले, आणि मला ते कळले आहे.
पलीकडच्या निळ्यानिळ्या अरबी समुद्रात डॉल्फिन्स सोनेरी उन्हात उसळ्या मारत आहेत. समुद्रपक्षी पाण्यावर घिरट्या घेत आहेत. यांना अरबीत ‘नवरस’ म्हणतात हे आठवून मला नेहमीप्रमाणे बरे वाटत आहे.
ही रंगीत लय सुंदर आहे.
संध्याकाळ उदास करून जगातल्या दु:खात आणखी एकाने भर घालू नये, हे निष्पर्ण पर्वतांवर उगवणारा चंद्र सांगत आहे.

थ्वीएवढी वयस्कर

पृथ्वीएवढी वयस्कर होईन, तेव्हा कदाचित
तिच्याइतकी पाणीदार कविता लिहू शकेन!
तिच्याएवढी तरुण होईन, तेव्हा कदाचित
तिच्याइतके जंगलदार प्रेम करु शकेन!
हरवलेले बालपण मात्र
आम्ही दोघीही शोधत आहोत...
सापडलेच कदाचित तर
आम्ही एकमेकींच्या पोटात गुडूप होऊ....
हरवलेल्या कविता
कानाला कान लावून ऐकत राहू.....
जमिनीला कान लावून झोपशील तेव्हा
तू म्हणशील हा आवाज कसला आहे?
ही गाणी कसली आहेत?
मग तू ही
पृथ्वीइतका वयस्कर होण्याची वाट पाहू लागशील...

मातीला एक उचकी लागली

मातीला एक उचकी लागली
आणि संपूर्ण झाड थरथरले....
फूल डोळ्यांत पाणी आणून म्हणाले,
‘मुळाला धक्का लागावा,
इतकी आठवण कुणी काढली?’
मातीला एक उचकी लागली
आणि बाग सारी कंठाशी आली....
जाईजुईखाली देह ठेवताना
तू कसाबसा म्हणालास,
‘मी इथेही तुझ्या आधी आलो होतो,
तिथेही तुझ्या आधी पोहोचेन
तू येण्याची घाई करू नकोस... हसून जग...’
तेव्हापासून मातीला उचकी लागते
मुळाला धक्का लागतो
माहित असूनही फूल विचारते,
‘इतकी आठवण कुणी काढली?’

ओलसर केस उदवून सुगंधी करते

ओलसर केस उदवून सुगंधी करते
काही निवांत क्षणांसाठी बाई प्रेयसी होते...
येमेनच्या लोबानमध्ये विचारांचा लंबक ठेवते
धुराच्या वलयात प्रियकराचा उदी चेहरा पाहते
चेहऱ्यावरून नजरेचा मायाळू हात फिरवते
बाई केसांवर सुगंधाचा पूल बांधते, आणि
येमेनच्या लोबानवरून प्रियकराला शोधायला निघते...
केसातल्या सुगंधाला हळूहळू प्रेमकहाणी सांगते
थबकते...... विस्तवावर उदाचा खडा ठेवते
झरझरून उठणाऱ्या डोळ्यांत पाणी लपवते
येमेनच्या लोबानला वारा घालत सांगते,
‘या केसात प्रियकराचा चेहरा हरवला आहे,
शोधून काढ,
त्याचे फूल करून माझ्या केसांत माळ...’
अशा क्षणासाठीही बाई प्रेयसी होते
ओलसर केस उदवून सुगंधी करते....

झोप येत नाही तेव्हा मी

झोप येत नाही तेव्हा मी
हाताला येईल तो धर्मग्रंथ उचलते
मऊ शालीत गुंडाळून उशाला घेते.
त्यावर डोकं टेकलं की फार गंमतीशीर विचार येतात,
‘एवढं सांगून, एवढं लिहून
दुनिया आहे तिथेच आहे मैत्रिणी!
तू जागी राहून, डोळे जाळून
काय होणारेय? झोप.’
तरी झोप धर्मग्रंथांसारखीच वागते
दंगा घालते, पण बदलत नाही....
पहाट झाली की
मी धर्मग्रंथ पुन्हा होता त्या जागेवर ठेवू पाहते
तर तो निसटून गेलेला असतो
त्याच्या चिंध्या चिंध्या जगभर पसरलेल्या असतात
मला आरत्या, अजान, चर्चबेल, जयघोष
सगळे कलकलाटून ऐकायला येते…..
मी टीव्ही लावून बंद करते
मी नेट connect करून disconnect करते
मी पेपर उघडून चुरगाळून टाकून देते...
मी मग बागेतल्या मुलांशी खेळायला जाते...
आम्हाला कुणालाच एकमेकांची भाषा येत नाही
तरी आम्ही भरभरून गप्पा मारतो,
आम्ही कुणीच खेळाचे नियम पाळत नाही
तरी आम्ही सगळे मनसोक्त खेळतो,
आम्हाला एकमेकांचे पदार्थही धड माहित नाहीत
तरी आम्ही चवीने खाऊवर ताव मारतो,
आमच्यापैकी कुणाचेच घर एका देशात नाही
तरी आम्ही आपापल्या घरी अचूक पोहोचतो...
मी ही परत येऊन पाठ टेकते
मला झोप लागते
मला मग धर्मग्रंथ लागत नाहीत.........

ही चादर जरा दूर करु दे

ही चादर जरा दूर करु दे
समुद्राचे पाणी आत येऊ दे
गर्भातल्या गाजेचा ईश्वर होऊ दे
ही चादर जरा दूर करु दे
देवघरातला प्रकाश आत येऊ दे
आपल्यातला अंधार सतेज होऊ दे
ही चादर जरा दूर करु दे
तुझा चेहरा माझ्यात उतरु दे
आपल्यातल्या मातीचे चंदन होऊ दे
ही चादर जरा दूर करु दे
फुले होऊन झाडांना खाली वाकू दे
जमिनीखालची प्रार्थना जंगल होऊ दे

‘मधल्या सुट्टीत

‘मधल्या सुट्टीत मुले त्यांच्या त्यांच्या भाषेत सुटतात!
आवरा त्यांना.
ही शाळा इंग्रजी माध्यमाची,
सांगा त्यांना इंग्लिशमध्ये बोला.’
असे फतवे ऐकत ऐकत सगळ्या मातृभाषा
अंग चोरून उभ्या राहतात ....
मी फतवे ऐकते, पण मुलांना काही सांगत नाही
त्यांच्या गप्पागाणी विनोदटवाळ्या
रागलोभ नि गॉसिपबिसिप
लाईनबिईनची खुसुरफुसुर मनातलं मनातलं
ऐकत ऐकत डुलू लागते त्यांची भाषा,
मी फतवे ऐकते, पण मुलांना काही सांगत नाही....
होय, मधल्या सुट्टीत मुले त्यांच्या त्यांच्या भाषेत सुटतात!
‘सर, तुमच्या आईच्या आजारपणात चिंतेने बोलताना
तुमच्या लेकीचे कौतुक सांगताना
दुसऱ्या बाळाच्या लीला हरखून सांगताना
चपराशाला शाबासकी देताना
लग्न ठरलेल्या बहिणीची फोनवरून खेचताना
मार्केटमध्ये मेथीच्या जुडीवरून घासाघीस करताना
भर पावसात छत्री दुरुस्त करून घेताना
..... शेकडो प्रसंगात तुम्हाला तुमच्या भाषेत ऐकलेय
छान वाटते तेव्हा, खरे वाटते तेव्हा
तुमच्यातला माणूस आवडतो मला...
त्या माणसालाच सांगते,
मुलांची मधली सुट्टी हिरावून घेऊ नका
सुटू दे, बोलू दे, त्यांची भाषा वापरू दे
.... जग अनेकात आहे, एकात सगळे घुसमटते
तुम्हालाही माहित आहे, सर
मधली सुट्टी म्हणजे आपापली भाषा
मर्जीची भाषा
सर, प्लीज.....'

झाड म्हणजे बाईची जात! कि

झाड म्हणजे बाईची जात!
कितीही विस्तीर्ण पंखांचा पक्षी विसावू दे,
झाड आरामात उभे असते....
पण पक्षी
झाडालाच आपल्या पंखाखाली घेऊ पाहतो
तेव्हा पाने सळसळून गोंगाट करतात
मुळासकट फांद्या काटे होऊन उलटतात
फुलं अंगार होऊन पंख छेदतात
झाड म्हणजे बाईची ओळख
झाड म्हणजे बाईची जात!
Not attempted.
उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन कसे करायचे यावर वर्कशॉप चालू होते . उदाहरण दाखवले की पटकन लक्षात येते, म्हणून मी मागील उत्तर पत्रिकांचे नमुने ठेवत असते. तसे यावेळीही ठेवले होते. एक बाई नव्या होत्या. नेहमीप्रमाणे गाडी, उत्तर न लिहिता प्रश्नाखालची जागा कोरी ठेवली, त्याचे काय करायचे याकडे आली.
'अशा वेळी not attempted / NA शेरा टाकायचा आणि पुढे जायचे,' आम्ही.
'फुली का मारायची नाही?'
'उत्तर लिहिलेच नसेल तर चूक कसे म्हणणार?'
'मग झिरो द्यायचा का?'
'NA म्हटले की झिरोचा प्रश्नच येत नाही.'
'असंही मार्क देणारच नाही तर फुली मारून झिरो दिले तर कुठे बिघडले?'
'मुलाने प्रश्न attempt च न करणे आणि चुकीचे उत्तर लिहिणे यात फरक आहे. प्रश्नाखालची जागा कोरी ठेवली की अनेक शक्यता निर्माण होतात. मुलाला प्रश्नाचे उत्तर येत नसेल, हा साधासरळ ठोकळेबाज कयास. पण, येत असूनही इतर अनेक कारणांनी त्याने लिहिले नसेल, असाही अर्थ निघू शकतो. म्हणजे वेळ पुरला नसेल, नेमके शब्द सापडले नसतील, माहित आहे पण पक्के आठवत नसेल, नेमके तेच लिहायचा आत्मविश्वास नसेल, याशिवाय त्या मुलाची आणि विषयाची शिक्षकाला असलेली जाण यावरून इतरही शक्यता निर्माण होतात म्हणून, फुली मारून बाद ठरवण्या ऐवजी not attempted म्हणालो की पालकांना fact सांगतो, मुलाला 'तू पुढच्या वेळी संधी मिळाली तर attempt करू शकतोस' असा संदेश आपसूक मिळतो. अर्थात, शिक्षक म्हणून जबाबदारी निरंतर राहतेच!'
पुढे मग उदाहरणे, शक्यता, चर्चा इत्यादी इत्यादी.
सहज विचार आला, जगताना आपण किती प्रश्न तसेच सोडून देतो! किती कोऱ्या जागा!! ज्यांना उत्तरे हवी असतात, त्यांना चूकबरोबर कोणतेही उत्तर न देता तसेच अधांतरी ठेवतो. ते आपल्या बाबतीत काय विचार करत असतील?
किंवा, उलट. आपल्याला ज्यांच्याकडून अगदी साध्या साध्या वाटणाऱ्या प्रश्नांची उत्तरे येत नाहीत - चूकबरोबर कशीही. तेव्हा आपण किती हवालदिल होतो!!
प्रत्यक्ष आयुष्यात not attempted हा प्रकार दोन्ही बाजूंनी विचित्र, अवघडच! कारण तिथे तुमचा विचार करणारे शिक्षक, पालक नसतात, की पुन्हा पुढे अशी संधी मिळेल, अशी काही शाश्वतीही नसते.

हुकलेले प्रश्न...

हुकलेले प्रश्न... फार क्वचित घडते, पण घडते. प्रश्नपत्रिकेत एखाद्या प्रश्नाचे उत्तर सगळेच्या सगळेजण ‘चुकीचे’ देतात. प्रश्न तयार करणाऱ्यां...