Friday, 20 March 2020

कथेची गोष्ट

वर्क फ्रॉम होम सुरु झाले.
मुलांसाठी काय काय तरी तयार करून पाठवताना, भाषेच्या बाबतीत गोष्टी, छोट्या छोट्या फिल्मस्, व्हिडीओ, कविता या सगळ्यांचे नीट संकलन करून ते पाठवायचे, या बाबतीत आपल्या टिमवर जरा कटाक्ष ठेवत असताना, काही 'भाषेला कशाला कविता, गोष्टींचे अवडंबर?' टाईपची नाराजीही आली.
इंग्लिश भाषा आणि साहित्य असे दोन भाग असले तरी, मुलांनाच नाही तर मोठ्यांनाही गोष्टी आवडतात, हे लक्षात घ्यावे. एरवी फेस टू फेसमध्ये या सगळ्यासाठी वेळ मिळेलच असे नसते. आता संधी आलीय, सुविधा आहे तर मुलांपर्यंत हे गेले तर चांगलेच, हे नाराजी पत्करूनही आपल्याला जरा रेटून पुढे न्यावे लागते. हे करताना, सहज आठवले.....
बी एड करताना काही तळमळीचे प्राध्यापक आमचे लेसन्स हटकून महानगरपालिकेच्या शाळेत लावत. तो लेसन माझ्या मनात आजही जसाच्या तसा आहे. जामानिमा करून full टू तयारीनिशी, 'आता या अवघ्या जगाला शिकवून सोडेन' या आविर्भावात गेले. जिथे कधी पाऊलच टाकायचा प्रसंग आला नव्हता, त्या महानगरपालिका शाळा नंबर XX मधला वर्ग. कसाबसा गणवेश, धूळमाखले चेहरे, पायात चपला आहेत आहेत नाहीत नाहीत, भले मोठे वर्ग, सगळी मुले खाली बसलेली, एक डुगडुगणारा टेबल आणि कशीबशी खुर्ची. मला एकदम भडभडूनच आले! काय इंग्लिश शिकवणार यांना? माझ्या आविर्भावाचे पाणी पाणी! Lesson observation ला आलेल्या सरांकडे 'आता काय करायचे' या अर्थी पाहिले. त्यांनी आश्वासक सुरात सांगितले, 'या स्थितीत तुला शिक्षक म्हणून जे योग्य वाटते ते कर.'
लेसन 'मैत्री' वर होता. सोबत नेलेले पुस्तक, लेसन प्लानची कागदं, teaching aids म्हणून नेलेली चित्रं.... सगळं सगळं बाजूला पडले, आणि क्षणभरात (हाच तो मार्मिक क्षण असतो बहुतेक ) वर्गाला हसून सामोरी गेले. शिक्षकांचे एक मनापासूनचे हसू समोर बसलेले पन्नास चेहरे उजळून टाकतात, हे तिथे मला पहिल्यांदा उमगले. मग मराठीत, त्यांना समजेल अशी 'कबूतर आणि मुंगी' ही गोष्ट सांगायला सुरुवात केली. वर्ग शांत, चेहरे उत्सुकतेने ओसंडून, गोष्ट किती रंगली....! बेल कधी झाली, कळले नाही. साध्या गोष्टीला त्यांनी वाजवलेल्या त्या टाळ्या अजून कानात आहेत.
बाहेर आल्यावर सरांना मी आपले सांगून टाकले, 'सर, तुम्ही पाहिले, तयार केलेलं शिकवायला वेळच नाही मिळाला, सॉरी! माझे इंटर्नल मार्क्स गेले बहुतेक!' ते म्हणाले, 'लेसन कुणीही शिकवेल, ते नंतर! आधी मुलांना गोष्ट सांगता आली पाहिजे. भाषेच्या शिक्षकाला तर गोष्ट कुठल्याही परिस्थितीत सांगता आली पाहिजे. भाषा माध्यम आहे, गोष्ट जगणे आहे! मुलांच्या उत्स्फूर्त टाळ्या मार्कांच्या पलीकडे असतात!'
लेसन लेसनने शिक्षकांचे डोळे उघडत जातात...
...... आणि आज, या श्रीमंत देशात, साधनसुविधा असताना, गोष्टी आयत्या तयार असताना, त्यातल्या योग्य त्या मुलांपर्यंत पोहोचवणे एवढेच काम करायचे आहे, तरी जेव्हा नाराजी दिसते, तेव्हा आपण नाराज न होता, गोष्टींचे महत्व परत अनुभवाची गोष्ट सांगून अधोरेखित करायची.

Wednesday, 18 March 2020

आपल्याला जे हवे

आपल्याला जे हवे ते सगळेच
मिळाले नाही,
करता आले नाही,
तर ते हवेहवेसे दुःखही
फार छान मिरवता येते....
पण जे नकोच आहे
ते वाट्याला आले
तर नाइलाजाने करत राहतो...
त्याची सवय होते
मन मरुन गेल्याचेही समजत नाही
आपण सुमारे संपून गेलेलो असतो...
पण, हवेनकोचा आॕप्शनच काढून टाकला की
काळीज, डोळ्यांतली ओल, हातातली थरथर
स्वप्नांची भाषा, आठवणींनंतरचा सन्नाटा
गर्भाशयाआधीची ओळख, सरणानंतरचे विस्मरण
बाय डिफाॕल्ट त्यांचेत्यांचे काम करु लागतात
आपण त्यांना तिथेच सोडून
आतल्याआत झोपी जावे....
फक्त, तो आॕप्शन तेवढा काढून टाकता यायला पाहिजे!

Tuesday, 17 March 2020

शिकवा पोरांना!!

.... तर खपून खपून सरामॕडमांनी content तयार करुन Google classroom मध्ये अपलोड केला. चोवीस तास उलटून गेले तरी आपल्या एकाही गुणी बाळाने तो उघडूनही पाहू नये, याचे काही शिक्षकांना भलते वाईट वाटत होते. 😑
कुणी कुणाशी बोलत नव्हतं. सगळे निमूटपणे पुढच्या लेसनच्या तयारीत. 😌👩‍💻
.....तर तेवढ्यात बरोब्बर साडेअकरा वाजता एका नोटिफीकेशनने इवलासा फुगा सोडला. 🎈पिंगलेलं एका उत्साही कानाने ऐकले. तिने हातातले पुस्तक तिथ्थेच टाकले, आणि आधी तो फुगा फोडला. अबाबाबा, काय ती खुशी!!😀🥰आपलं एक तरी कार्टं गुगल क्लासरुममध्ये आलं!!😌
पाचवीतली सारा होती.
तिकडून - Hi teacher! How are you doing?😀
इकडून - (काय बोलू नि किती बोलू🤩)
तिकडून - Am happy at home. 💃
इकडून - Please, check the assignment. 😎
तिकडून - You know teacher...... (बडबड, करोना काय आहे हे चिमुकल्या बोटांनी टाइपलेले वाचून बाई कृतकृत्य!😌)
इकडून - Please,check the lesson...👩‍💻
तिकडून - You know Miss.....(घरी मग कायकाय केले ती बडबड....🙅‍♀️🙋‍♀️💁‍♀️💃🤹‍♀️👨‍👩‍👧‍👧)
इकडून - Habibi, there's a lesson, please, check.
तिकडून - Take care teacher. Stay safe. Luv u.
इकडून - Please, complete the task.....
कुठलं ऐकायला? पोरगी log out!
शिकवा पोरांना!!😉🤩😀

Sunday, 15 March 2020

हाडामांसाचे मास्तर

.... तर ओमान काय कधी कुणाच्या अध्यात मध्यात नसतो, आपण भले की आपली टापटीप, स्वच्छता बरी ! त्यामुळे सगळ्या GCC ने कोरोनाला घाबरून सुट्टी घेतली, तरी आम्ही डब्बल स्वच्छता पाळून श्रमत होतो.😌 पण शेवटी सुलतानसाहेबांनी फतवा काढला, आणि आजपासून मुलांसाठी शाळा बंद झाली. रोज फेस टू फेस भरणाऱ्या शाळा, रातोरात online गेल्या. 🙄
सगळ्या विषयांचे शिक्षक, त्यांचे हेडं, जुनी पुस्तकं नव्या रीतीने अभ्यासायला गोल करून बसले.🤓 कुठला लेसन online कसा घालता येईल, कशाच्या लिंका टाकायच्या, आपल्या कार्ट्यांना काय केलं तर मास्तर समोर नसतानाही धडा धड कळेल या विवंचनेत!🧐 तर काहीजण 'मी नाही बाई माझा चेहरा दिसू देणार, माझ्या व्हिडीओचा गैरवापर झाला तर!' म्हणत फलकारणाऱ्या, 🤷‍♀️ तर काही गडद मस्कारा आणि हलका पावडरीचा हात मारून लगेच स्क्रीनसाठी टकाटक तैय्यार 💃! काही I वरून IT च ओळखणारे प्रचंड उत्साही शिक्षक...👨‍💻👩‍💻.हा App recording साठी, तो shooting साठी, तो बोललेले डायरेक रेकॉर्ड करणारा.... त्यांना एकाच वेळी काय वापरू, किती वापरू याचं भरतं आलेलं ! सरामॕडमांचा माहोल नुसता.🦹‍♂️🦸‍♀️🦹‍♀️😀
बघता बघता एकएक लेसन तयार होऊ लागतो. सगळेच नवीन काहीतरी करू पहात होते, ते चित्र मनाला सुखावते.😌 या सगळ्यांची मोट बांधता बांधता आपण एकदम भानावर येतो, आणि एक चक्कर मारण्यासाठी आयटी रूमबाहेर जातो. मुले नसतात, त्यांचे हसू नसते, hi, hello, सलाम काहीच ऐकायला येत नाही, त्या सुरमेदार मुली नसतात, मैदानावर ते हाकारे नसतात, एका गोलसाठी जीव खाऊन बॉलमागे धावणारे नसतात, लायब्ररीत गढलेला एकही शुभ्र लिहाफ दिसत नाही, आर्टरूम अडगळीच्या खोलीसारखी दिसते .... कुणीच नसते! मुले नसलेली शाळा, थोडावेळ बरी वाटते, नंतर नकोसे वाटते.... 😶
पुढच्या काही वर्षांत virtual classroom ही कदाचित एक reality होईलही, पण आमच्यासारखे हाडामांसाचे मास्तर त्याचा भाग होऊ की नाही माहित नाही.😑

Friday, 13 March 2020

महमूद दरवेश

आज १३ मार्च. महमूद दरवेश या पॕलेस्तिनी कवी-लेखकाचा जन्मदिवस. लहानपणीच रातोरात आपल्या घरातून, भूमीतून परागंदा व्हावे लागले. सगळी हयात घरी परतण्याच्या धडपडीत गेली. आपल्या भूमीच्या स्वातंत्र्यासाठी देशोदेशी भटकत राहणारा, आपला शब्दनशब्द तिच्या मुक्तीसाठी खर्च करणारा हा कवी, अरबांच्या समूहस्मरणात कायम आहे. त्याच्या 'Identity Card' या कवितेचा हा स्वैर अनुवाद. संपूर्ण लेख 'वर्णमुद्रा' मध्ये लवकरच प्रकाशित होईल.
ओळखपत्र
घ्या लिहून!
मी अरब आहे
ओळखपत्र नंबर पन्नास हजार!
मला आठ मुले आहेत
या उन्हाळ्यानंतर नववे जन्माला येईल
काय, राग आला ना?
घ्या लिहून!
मी अरब आहे
इतर कामागारांबरोबर या खाणीत काम करतो
मला आठ मुले आहेत...
या खडकांतूनच मी त्यांच्यासाठी
अन्न, कपडे आणि पुस्तकं घेतो
तुमची भीक मिळावी म्हणून लाचार होऊन
मी तुमच्या दारात उभा रहात नाही
का, राग का येतो?
घ्या लिहून!
मी अरब आहे
कुठलाही हुद्दा नाही, पण मला माझे नाव आहे.
ज्या देशात लोकांना
या ना त्या कारणांवरून उचकवले जाते
तिथे मी धीरोदात्तपणे उभा आहे...
तुम्ही काळाची गणना करण्याआधी,
इथे पाईन आणि आॕलिव्हची झाडे उगवण्याआधी,
इथे गवताची पाती उगवण्याआधीपासून
माझी मुळे इथे प्रगाढ आहेत...
माझा बाप नांगर धरणाऱ्यांच्या घरातला
माझा आज्जा शेतकरी
कुणीही खात्यापित्या घरातले नव्हते,
आम्ही नव्हतोच कधी ‘आहे रे’ वाले!
वाचायला शिकवायच्या आधी
त्यांनी मला सूर्याचा अभिमान बाळगायला शिकवले
फांद्यातुराट्यांच्या कुडाची झोपडी
म्हणजे माझे घर!
हा माझा समाजातला दर्जा
झालं समाधान?
कुठलाही हुद्दा नाही, पण मला माझे नाव आहे
घ्या लिहून
मी अरब आहे.
माझ्या पुर्वजांच्या बागा,
मी कसलेली जमीन,
माझ्या मुलाबाळांसह तुम्ही चोरलीत
या दगडांव्यतिरिक्त आमच्यासाठी तुम्ही काहीच ठेवले नाही..
तुम्हाला आमचं सगळंच पाहिजे
तर ही दगडंही घ्याल का?
म्हणून!
पहिल्या पानावर अगदी वरती
घ्या लिहून:
मी माणसांचा तिरस्कार करत नाही
मी अतिक्रमणही करत नाही
पण जर मला भूक लागली तर...तर
बळकावून घेणाऱ्यांचे मांस माझे अन्न असेल..
सावध रहा
माझ्या भुकेपासून
माझ्या क्रोधापासून ....
महमूद दरवेश
मराठी अनुवाद - Shivkanya Shashi

Saturday, 7 March 2020

दुनिया चलती हैं ....

दुनिया चलती हैं ....
ओमानचे सुलतानसाहेब कालवश झाल्यानंतर चाळीस दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा पाळला गेला. अर्थातच ध्वज अर्ध्यावर उतरला, संगीत, जलसे, खेळ, सार्वजनिक ठिकाणचे gathering सगळे रद्द झाले.
शाळेत सकाळच्या assembly मध्ये फक्त कुराण आणि हादिथ वाचले जावे, राष्ट्रगीत आणि सलामे सुलतानी पुढच्या सूचना मिळाल्यानंतर म्हटले जावे, अशा सरकारी सूचना मिळाल्या. सगळ्याचे तंतोतंत पालन केले गेले.
दुखवट्याचे चाळीस दिवस संपले. त्या दिवशी नवे राष्ट्रगीत आणि सलामे सुलतानी होणार होती. आम्हाला उत्सुकता होती. संगीत वाजू लागले, आणि आमचे अरबेतर कान टवकारले. राष्ट्रगीत तेच होते, फक्त शेवटच्या दोनतीन ओळीतील आधीच्या सुलतानांचे नाव काढून, त्या ठिकाणी ओमानी प्रजेसाठी "raise to the sky and fill the universe with light, be happy and prosper" असे साधारण केल्याचे आमच्या दुभाषाकडून कळले.
सलामे सुलतानी मध्ये फक्त सुलतानाचे नाव बदलले होते. मुलांनी हे सगळे अगदी आरामात केले. त्यांच्यात कोणतीही उत्सुकता दिसली नाही. अगदी मागील सुलतानाने हा देश उभारण्यासाठी आपली हयात खर्च केली तरी, एक सुलतान गेला, दुसरा आला, एवढा निर्विकार व्यवहार त्या असेम्ब्लीत दिसला. ते पाहून माझे एक मन जरा अस्वस्थ झाले, पण दुसरे मन म्हणाले, 'ठिक आहे, नाहीतरी कुठल्याही राजसत्तेविषयी फारशी attachment नवी पिढी दाखवत नाही, हे ही बरेच.' चूक बरोबर इतक्यात ठरवता येणार नाही, परंतु असे घडले मात्र.
की, चतकोर स्क्रिनमध्ये आकंठ बुडालेल्या नव्या पिढीला कशाने काही फरक पडतच नाही!? 'दुनिया चलती हैं, बस चलते रहो' एवढेच करावेसे वाटते?!

हुकलेले प्रश्न...

हुकलेले प्रश्न... फार क्वचित घडते, पण घडते. प्रश्नपत्रिकेत एखाद्या प्रश्नाचे उत्तर सगळेच्या सगळेजण ‘चुकीचे’ देतात. प्रश्न तयार करणाऱ्यां...