Random thoughts....
WhatsApp, messenger, free video call चे apps, FB, Insta, Twitter, Google च्या घरच्या आठशे खिडक्या इ इ इ.... यामुळे ओळखीतला माणूस सहसा नजरेआड होत नाही. त्याच्या बोटाग्रांचे डिजीटल ठसे कुठेनाकुठे दिसत राहतात, माणसे हयात आहेत, आणि आपला ठसा उमटवण्याइतकी शक्ती अजून राखून आहेत, हे कळून बरे वाटते.
त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या विरहाची, दुराव्याची सजा, मजा, त्यातली व्याकुळता, गहिरेपणा बऱ्याच अंशी नाहीसा होत आहे. यावरही बरेच डिजीटल चिंतन आधीच झाले आहे. डिजीटलच ते! Vitamin च्या गोळीप्रमाणे या डिजीटल चिंतनाची पुडीही आम्ही पटकन खाल्ली, पचवली आणि पुन्हा पुढच्या डिजीटल विचाराला सुरुवात! तसे, चांगलेच आहे की! कोण कुणाला miss करतच नाही. डिजीटल वरदान!
पण अलीकडे प्रश्न पडतात. खऱ्याखुऱ्या माणसांचे स्मरण स्वत:च्या डिजीटल विश्वाइतकेच आकुंचित झाले आहे का? त्या अलीकडची आणि पलीकडची माणसे आपल्या स्मरणातून हळूहळू नामशेष होत आहेत का? ज्या माणसांचे डिजीटल प्रोफाईलच नाही, त्यांचे माणूस म्हणून स्मरण कसे करावे?
पत्र पोहोचले पोहोचले नाही नाही, अशा काळात माणसे एकमेकांच्या खुशाली विषयी अंत:प्रेरणेवर विसंबून असत, मनाला विचारून बघत. ती शक्ती आजच्या डिजीटल गाळात रुतत हळूहळू नाहीशी होईल का? तसे झाले तर, आपण आपल्यातले काय गमावू? आपण काही गमावले आहे, हे तरी आपल्याला समजेल का?
No comments:
Post a Comment