Friday, 29 May 2020

ठू का?

माझ्या आईच्या वयाची मावस बहिण आहे. तिला WhatsApp वर टायपिंग म्हणजे घनदाट केसात लिखा शोधत बसल्यासारखे वाटते. ती आपलं खच्चाकन माईकचा आयकॉन दाबते, मन:पूत बोलते, आणि सोडून देते आवाजी मेसेज!
आज सकाळी बराच वेळ आमचा आवाजीआवाज खेळ झाला. मग तिचा निरोपाचा मेसेज - 'हां तर काळजी घ्या. ठु का मग फोन? ठेवला हां !'
तिचा भाबडेपणा ऐकून हसता हसता एकदम भरूनच आले. या पिढीने आपली घरटी एकदम रिकामी होऊन जगभरात विस्तारताना पाहिली. आजच्या या कठीण काळात मिळेल ते यंत्र घेऊन, जमेल तसं आवाज ऐकण्यासाठी, एकमेकांना बघण्यासाठी जी धडपड चालू आहे, ती मधला समुद्र हेलावून टाकते.
त्यात कुणी 'ठु का फोन?' म्हटले की तो दोन बोंडके असलेला रिसिव्हर कानाशी धरून बराच वेळ ट्रंककॉलची वाट पहात उभी असणारी आईची आख्खी पिढी दिसू लागते.

No comments:

हुकलेले प्रश्न...

हुकलेले प्रश्न... फार क्वचित घडते, पण घडते. प्रश्नपत्रिकेत एखाद्या प्रश्नाचे उत्तर सगळेच्या सगळेजण ‘चुकीचे’ देतात. प्रश्न तयार करणाऱ्यां...